“सर्जिकल स्ट्राईकचे लवंगी फटाके फोडून.”, संजय राऊतांनी सदाला थेट मोदी सरकारवर निशाणा

 

मुंबई | सध्या देशभरात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. यावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आज हजारो पंडित आजही निर्वासित छावण्यांतच राहत आहेत व भाजपचे सरकार दिल्लीत आले म्हणून त्यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही. पंडितांना घरे सहज देता आली असती. मोदी सरकारला अजून कश्मिरी पंडितांना घरे देता आलेली नाही , तेव्हा त्यांची सुरक्षित घर वापसी तर दूर की बात! असा टोला संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून लगावला आहे.

काय लिहिले आहे सामना अग्रलेखात वाचा

पाकव्याप्त कश्मीर घ्यायचे म्हणजे मोदी सरकारला पाकिस्तानशी थेट युद्ध करावे लागेल. सर्जिकल स्ट्राईकचे लवंगी फटाके फोडून पाकव्याप्त कश्मीर आपल्या ताब्यात येणार नाही. आपण अद्याप पाक तुरुंगातील कुलभूषण जाधव यांना सोडवू शकलेलो नाही. इकडे ऊठसूट “दाऊद दाऊद” असे करायचे, पण त्या दाऊदचा ताबाही आपल्याला मिळविता आलेला नाही. त्यामुळे पाकच्या ताब्यातील कश्मीर घेण्याचा संकल्प कसा पूर्ण होणार? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच अमेरिकेने सरळ सरळ इराकचा घास घेतला तेव्हा भारताने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. इराकचा सद्दाम हुसेन हा तर भारताचा उघड मित्र होता व कश्मीरच्या प्रश्नी तो सर्वच आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या बाजूने उभा राहिला होता. आता रशिया- युक्रेन युद्धातही आपण पंडित नेहरूंचेच अलिप्तवादाचे धोरण स्वीकारून गप्प बसलो आहोत.

आज त्याचमुळे पाकव्याप्त कश्मीर आझाद करण्यासाठी पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची तयारी मोदी सरकारची आहे काय? पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच आहे , पण तो पूर्णत्वास कसा नेणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Team Global News Marathi: