‘सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुका होतील’

 

ओबीसी आरक्षणासहअन्य काही तांत्रिक मुद्यांमुळं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र राज्यात आता नवं शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तरी निवडणुका होतील का? असा सवाल केला जात असताना सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य करत निवडणुका होण्याबाबत संकेत दिले आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुका होतील, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात एबीपी माझाशी बोलत होते.

ते म्हणाले की, चर्चा करणारे आमची सत्ता आली हेच पचवू शकत नाहीत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्या विचारतात एकही महिला मंत्रिमंडळात नाही. मात्र मविआचे पहिले मंत्रिमंडळ बनले, तेव्हा एकही महिला मंत्रिमंडळात नव्हती. त्यामुळे पॉलिटिकल अल्झायमर होता कामा नये. मंत्रिमंडळ नव्हते तेव्हाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करतच होते, असंही मुनगंटीवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या आता पर्यंतच्या सर्व बैठकात आम्ही भरभरून निर्णय घेतले. आधीच्या सरकारच्या सुरुवातीच्या बैठकीत कोणतेही निर्णय झाले नव्हते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अनेक वेळेला घोषणा केली मात्र पूर्तता केली नाही, असा आरोपही मुनगंटीवारांनी केला.

मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना आमच्याशी आणि जनतेशी बेइमानी करून सत्तेत आली. एक कपोलकल्पित कहाणी सांगितली की आम्हाला अडीच वर्षांचा शब्द दिला गेला होता, आता भिंती बोलू शकत नाहीत. प्रचारात भाजपचा मुख्यमंत्री असे मान्य करून प्रचार केला. निवडणुकीनंतर जेव्हा आमचे 105 आमदार आले, तेव्हा शिवसेनेविना सरकार येऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेना बदलली, मोलभाव सुरू केला, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: