अवमान करणारी विधानं करण्यापासून संजय राऊताना रोखा आयएमएची उपराष्ट्रपतीकडे तक्रार

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर, खासदार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.तर
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) राऊतांविरोधात थेट राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे तक्रार केली आहे. राऊतांना डॉक्टरांचा अवमान करणारी विधानं करण्यापासून रोखा, अशी विनंती आयएमएने व्यंकय्या नायडू यांना केली आहे.

आयएमएने थेट राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून संजय राऊत यांची तक्रार केली आहे. संजय राऊत हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहे. त्यांनी एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टरांचा अवमान करणारं विधान केलं आहे. डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळतं. मी नेहमीच कंपाऊंडरकडून औषधे घेतो, डॉक्टरांकडून नाही, असं ते या मुलाखतीत म्हणाले होते. तसेच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ही निरुपयोगी संस्था आहे. डब्ल्यूएचओच्या निष्काळजीपणामुळेच करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, असंही राऊत यांनी म्हटल्याचं आयएमआयने तक्रारीत म्हटलं आहे.

१६ ऑगस्ट रोजी आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात राऊत यांच्या वक्यव्याच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच राऊत यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत आणि डॉक्टरांची माफी मागावी असा ठरावही करण्यात आल्याचं आयएमएने म्हटलं आहे. राऊत यांचं हे विधान डॉक्टरांचा अवमान करणारं तर आहेच पण डॉक्टरांचा अनादर करणारंही आहे. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यापासून करोनाच्या संकटातही धैर्याने काम करणाऱ्या डॉक्टरांचं मनोबल खच्चीकरण करणारं राऊत यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे राऊत यांना अशा प्रकारची विधानं न करण्याची समज द्यावी, अशी मागणीही आयएमएने नायडू यांच्याकडे केली आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी कधीही डॉक्टरांकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो. डॉक्टरांना काय कळते, असे विधान केले होते. यावर राज्यातील  डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान संजय राऊत यांनी आपण डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. आपण नेहमी डॉक्टरांच्या पाठीशी उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु राऊतांच्या स्पष्टीकरणा नंतरही हे प्रकरण शमले नसून इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन लिहीलेल्या पत्रात म्हटले की, “सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे, याची तुम्हाला जाणीव आहे. आरोग्य कर्मचारी केवळ आपलाच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असणा-या जोडीदार, मुलं, वयोवृद्ध आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी फ्रन्ट लाईन वर्कर्स सोबत उभे राहावे अशी अपेक्षा आहे. संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरांपेक्षा जास्त कळते असे म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत.

आम्ही त्यांच्या वागण्याचा निषेध करतो व राजीनाम्याची मागणी करतो. अशा अपमानजनक आणि नकारात्मक प्रतिक्रियांमुळे आम्ही पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. डॉक्टरांचे खच्चीकरण झाले असून तुम्ही योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: