संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा, पोस्टर केलं व्हायरल

 

कोल्हापूर | संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना तसेच महाविकास आघाडीकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले असून मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशातच संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा दिला आहे. याबाबतच पोस्टर व्हायरल होत आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना कोणत्याच राजकीय पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना शिल्लक मते देण्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर आपल्या विधानावर घुमजाव करत शिवसेना ज्याला पाठिंबा देईल, त्यालाच मते देण्यात येतील असे राष्ट्रवादीने जाहीर केले. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांचा मार्ग खडतर झाला.

शिवसेनेशी संभाजीराजे यांची चर्चा सुरु होती. मात्र, शिवसेनेने शिवबंधनाची अट टाकल्यानंतर संभाजीराजे यांना ती अट मान्य नव्हती. त्यामुळे त्यांना राज्यसभेत जाण्याचा मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. अशातच आता संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून एक फोटो व्हायरल करण्यात येतोय. या फोटोत आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार, असं लिहिले आहे. फोटोत इतिहासाची पुनरावृत्ती, राज्यात स्वराज्याची निर्मिती, आता लक्ष 2024 असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे सोशलवर मीडियात संभाजीराजे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Team Global News Marathi: