संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण…”

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला.यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

जवळजवळ १७० लोक निवडून आले होते. ही अपेक्षा होती की, भाजप-शिवसेना युतीचे सरकार तयार होईल. पंतप्रधानांनी सर्वांच्या उपस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री बनेल, अशी घोषणाही केली होती. परंतु, दुर्दैवाने निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि शिवसेनेचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला, ज्यांनी हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवले. हा खरे तर जनमताचा अपमान. जनतेने मते महाविकास आघाडीला दिली नव्हती. भाजपा-सेना युतीला दिले होते. जनमताचा अपमान करून मविआ स्थापन केली, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दररोज सावरकरांचा अपमान, हिंदूंचा अपमान केला जात होता. शेवटच्या दिवशी नामांतराचा ठराव झाला. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर औरंगाबद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबाद शहराचे धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. गेल्या दीड वर्षांत यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. बहुमत चाचणीचे निर्देश देण्यात आल्यावर कोणतीही मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही. तरीही ती घेण्यात आली. या प्रस्तावाला आमचे समर्थन आहे. मात्र, नव्याने येणाऱ्या सरकारला पुन्हा याचे निर्णय घ्यावे लागतील. कारण आधीचे निर्णय वैध नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: