दगड मारून पळून जाणे म्हणजे…उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पोलीस..

दगड मारून पळून जाणे म्हणजे…उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पोलीस..

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांसोबत आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्यात राजकीय राडा झाला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

‘गाडीवर दगड मारून पळून जाणे म्हणजे मर्दुमकी नाही. हा भ्याड हल्ला आहे. कायदा सुव्यवस्था पालन करण्याचं काम सरकारचं आणि पोलिसांचं आहे. ज्यांनी हे केलं आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, चिथावणी देण्याचं काम कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील,’ असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. परिस्थिता हाताबाहेर जायच्या आधीच पोलिसांनी नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते या हल्ल्यातून सुखरुप बचावले आहेत. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.

उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. इथल्या चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्ला केला.

साभार न्यूज 18 लोकमत

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: