मुंबईतील महिलेची नोकरीचे आमिष दाखवून आठ लाखाची फसवणूक
ग्लोबल न्यूज : नोकरीच्या अमिषेपोटी मुंबईत राहणाऱ्या महिलेला आपली चूक महागात पडलेली आहे. . प्रोसेसिंग फीच्या नावाखाली दहा रुपये भरताना ओटीपी सांगितल्याने महिलेच्या खात्यातील आठ लाख रुपये डेबिट झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दिल्ली येथे राहणाऱ्या एका टोळक्यांना अटक केली आहे.
मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेने शाइन.कॉम ( www.shine.कॉम) या नोकरी संदर्भातील वेबसाईटवर आपला बायोडेटा अपलोड केला होता. नोकरीच्या अपेक्षेने तिने आपले नाव नोंदवले होते. तिची प्रोफाईल पाहून एका व्यक्तीचा फोन आला. मी ‘शाईन.कॉम’मधून बोलत आहे, असे सांगून त्याने महिलेला तिच्या प्रोफाईलनुसार जॉब मिळवून देण्याचे आमिष सदर व्यक्तीने दाखविले.
नोकरी संदर्भात असलेली प्रोसेसिंग फी म्हणून दहा रुपये ऑनलाईन भरावे लागतील, अशी बतावणी तिला करण्यात आली. फोनवर संभाषण करणाऱ्या व्यक्तीने महिलेला इतके गुंतवले की, आधी त्याने तिच्याकडे बँकेचे अकाऊण्ट डिटेल्स मागितले. त्यानंतर प्रोसेसिंग फी भरण्यासाठी ओटीपी मागून घेतला.
ओटीपी दिल्यानंतर घडलेल्या प्रकाराने महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. बँकेकडून आलेल्या मेसेजमुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या खात्यातून दहा रुपये नाही, तर तब्बल आठ लाख रुपये काढण्यात आले होते. महिलेने भानावर येत तातडीने पंतनगर पोलिस स्टेशन गाठले होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.
.