रोहित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधणारी पोस्ट व्हायरल

 

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना पाहायला मिळतोय. आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनावरून विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत दिवसभरासाठी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी थेट शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

आज सकाळपासूनच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून जयंत पाटलांच्या निलंबनाचा निषेध नोंदवला. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांची नावे वापरत शिंदे – फडणवीस सरकारला धारेवर धरलंय.

नेमकी काय आहे पोस्ट?

आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर… ‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं! पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय… अरे… राज्याच्या भल्यासाठी थोडी तरी ‘आगे की सोच’ असू द्या.. नाहीतर ज्यांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं तेच उद्या म्हणतील ‘वाजवू का?’

Team Global News Marathi: