अपघातग्रस्तांसाठी संजीवनी ;स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

अपघातग्रस्तांसाठी संजीवनी ;स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळावा व लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे उद्दिष्ट विचारात घेऊन दि. 16 सप्टेंबर, 2020 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी दि.14 ऑक्टोबर, 2020 पासून सुरु करण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषतः अस्थिभंगच्या रुग्णांना तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने स्थिर करून स्थलांतरित केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू शकेल. तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तस्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलांतरित केल्यामुळे रक्त व रक्तघटक मिळून रुग्णाचे प्राण वाचतील. तसेच मेंदूला इजा झालेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देऊन व योग्य पद्धतीने स्थलांतरित केल्यास अशा रुग्णाचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास मदत होईल.

*काय आहे ही योजना… समजून घेऊ या लेखाद्वारे …! (भाग-1)*

राज्यात रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर (Golden Hour मध्ये) वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात दि.14 ऑक्टोबर, 2020 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचे स्वरुप व कार्यपद्धती खालीलप्रमाणे –

*योजनेचे उद्दिष्ट :-*
 अपघातानंतर पहिल्या 72 तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.
*योजनेचे लाभार्थी :-*
• महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेतील कोणत्याही रस्त्यांवर अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती (अधिवासाच्या अटीशिवाय ) या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.

• औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताने जखमी होणार्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
• तसेच द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यास शासनाच्या/ शासन अंगिकृत उपक्रमाच्या अपघात प्रतिपूर्तीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

*योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ :-*
 रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा पहिल्या 72 तासासाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून 74 उपचार पद्धतींच्या (परिशिष्ट-अ) माध्यमातून देण्यात येतील.

 योजनेंतर्गत अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यात येईल.
 प्रति रुग्ण प्रति अपघात रुपये 30,000/- (रू. तीस हजार) पर्यंतचा खर्च अंतिम केलेल्या package च्या दरानुसार या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयास विमा कंपनीकडून अदा करण्यात येईल.

 स्थलांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात पुढील उपचाराच्या सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणान्या जवळच्या रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेने.ती उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने रुग्ण स्थलांतरित केला जाईल.

 अशा परिस्थितीत package च्या दराव्यतिरिक्त रुपये 1,000 पर्यंत रुग्णवाहिकेचे भाडे विमा कंपनी मार्फत अंगीकृत रुग्णालयास देण्यात येईल.
 रुग्णालय जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना/प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त असेल व रुग्ण या योजनेचा लाभार्थी असेल व होणारे उपचार योजनेपैकी असून त्याची पूर्वमंजूरी मिळाली असेल तर त्या उपचारासंबंधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या/प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पॅकेजची आर्थिक तरतूद रुग्णालयास मिळेल.

*रस्ते अपघात प्रतिसाद:-*
 अपघातस्थळाच्या जवळ असलेली कुठलीही व्यक्ती 108 या क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावेल.

 *आपात्कालीन वैद्यकीय सेवा* (MEMS- Maharashtra Emergency Medical Services) विभागातर्फे घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविली जाईल, 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास जवळची शासकीय रुग्णवाहिका, ती उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णवाहिकेने रुग्णास जवळच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी असेल.

 अपघातग्रस्त रुग्णास रुग्णालयामध्ये नि:शुल्क वैद्यकीय सेवा व उपचार दिले जातील.
 व्यक्ती रुग्णालयात भरती झाल्यापासून पहिल्या 72 तासांमध्ये दिलेल्या उपचारांच्या खर्चापोटी विमा कंपनीमार्फत रुग्णालयांचे दावे अदा करण्यात येतील.
*योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यापासून 72 तासापर्यंत नि:शुल्क अनुज्ञेय सेवा:-*
 रुग्णालयात दाखल झाल्यापासून 72 तासापर्यंत खालील निशुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील.
 जखमेतून होणारा रक्तप्रवाह थांबविणे, जखमेस टाके घालणे तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक उपचार करणे.
 अतिदक्षता विभाग व वार्डमधील उपचार.
 अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार.
 अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परीस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे
 रुग्णास साधारण रक्तस्त्राव झाला असेल तर रक्त (Whole blood) देणे.
अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्तघटक पी.सी.व्ही. (Packed cell volume) देणे, अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकते प्रमाणे रक्त घटक प्लाझा (Plasma) देणे, अपघातामुळे अतिरक्तस्राव झाल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे ताजे रक्त किंवा रक्तघटक बिम्बिका (Platelets) देणे.
 तज्ञांनी सुचविलेल्या 74 प्रोसिजर्स मधील विविध तपासण्या व औषधोपचार (परिशिष्ट-अ नुसार).
 रुग्णाच्या रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन.

*अंगीकृत रूग्णालये :-*
 Emergency आणि Polytrauma sevices देण्याची सोय असणारी सर्व शासकीय आणि इच्छुक खाजगी रुग्णालये तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील Emergency आणि Polytrauma sevices साठी इच्छुक अंगीकृत रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल.
 108 रुग्णवाहिकेद्वारे किंवा ती उपलब्ध नसल्यास इतर पर्यायाने अपघातग्रस्त रुग्णास अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित केले जाईल.

 अंगीकृत रुग्णालयांची GPS द्वारे mapping केली जाईल. उपलब्ध उपचार सुविधेच्या आधारे रुग्णालयाची Level १ (Super Specialty Care, Level २ (Secondary care) and Level ३ (First referral care) अशी वर्गवारी करण्यात येईल.
 ही योजना विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणार असून निविदा पद्धतीने निवडण्यात आलेली विमा कंपनी व राज्य आरोग्य हमी सोसायटी तसेच विमा कंपनी व इच्छुक रुग्णालये यामध्ये करार करण्यात येईल.(क्रमशः)

(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: