चीन आणि उत्तर कोरिया यांची मैत्री जगजाहीर आहे. उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशहा किम जोंग उन याच्या मिसाईल बनवण्याच्या स्वप्नाला चीन खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट असून याच जोरावर उत्तर कोरिया थेट महासत्ता अमेरिकेला देखील अंगावर घेत आहे. मात्र आता हाच उत्तर कोरिया आणि हुकूमशहा किम हिंदुस्थानचा फॅन झाला आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू असताना हिंदुस्थानने अनेक देशांना मानवतेच्या दृष्टीने वैद्यकीय मदत केली आहे. मग ते दुष्मन राष्ट्र असो किंवा मित्र राष्ट्र हिंदुस्थानने सर्वोतोपरी मदत केली आहे. आता देखील हिंदुस्थानने चीनचा जिगरी मित्र असलेल्या उत्तर कोरियाला तब्बल 10 लाख डॉलरचे वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतला यासाठी विनंती केली होती. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.
चीनने वाऱ्यावर सोडले, भारताने तारले
उत्तर कोरियात टीबीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचमुळे हिंदुस्थानने उत्तर कोरियाला वैद्यकीय साहित्य, उपकरण तसेच टीबीच्या उपचारासाठी 10 लाख डॉलरची औषधे पाठवली आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
भारताने पाठवलेली मदतीची खेप राजदूत अतुल मल्हारी यांनी स्वीकारली आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती उत्तर कोरियाला सोपवली. उत्तर कोरिया हा चीनचा मित्र असला तरी चीनने मदतीचा हात आखडता घेतला, नंतर हिंदुस्थानने मानवतेच्या दृष्टीने मदत केली.
साभार सामना ऑनलाईन