आत्महत्येपूर्वी शीतल आमटे यांची भावुक पोस्ट वाचा
डॉ शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्यांनी डॉ. शितल ह्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. दरम्यान आत्महत्येच्या आधी त्यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली होती.
शीतल आमटे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकला एक पेंटिंग शेअर केली आहे. ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढलं होतं. या पेंटिंगवर त्यांचं नाव आणि २९ नोव्हेंबर २०२० अशी तारीख देखील आहे. महत्वाचं म्हणजे ही पोस्ट शेअर करताना त्यांनी War and Peace म्हणजेच युद्ध आणि शांतता अशी सूचक कॅप्शन दिली आहे.
शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले होते.
'War and Peace'#acrylic on canvas.
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020
दरम्यान शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.
डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.