पुन्हा भाजपचा शेतकऱ्यांवर अन्याय, कृषिमंत्री तोमर यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांवर लाठीहल्ला!

 

उत्तरप्रदेशातील लखमीपूर खेरीतील शेतकऱ्यांवर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मध्य प्रदेशात खत टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱयांवर भाजप सरकारने लाठीहल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मुरैना मतदारसंघात हा लाठीहल्ला झाला असून अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. सर्वत्र अफरातफरी माजली आहे.

रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांची देशभरात मागणी आहे. मात्र, मध्य प्रदेशात खतांची मोठी टंचाई आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुरैना मतदारसंघात खतटंचाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत. सरकारकडून शेती सहकारी संस्थांमार्फत शेतकऱयांना खत पुरवठा केला जातो. मात्र, टंचाईमुळे खतखरेदीसाठी मोठय़ा रांगा लागत आहेत. मुरैना मतदारसंघातील पैलारस येथे खते खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या.

यावेळी चेंगराचेंगरी, अफरातफरी झाली. पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे. लाठीहल्ला करतानाच पोलीस शेतकऱयांना रांगेतून ओढत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळातील कृषिमंत्री ओपीएस भदोरिया यांच्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे. खतटंचाईची तक्रार करणाऱया शेतकऱयांवरच कृषीमंत्री भडकले. मेहगाव येथे ते मोबाईलवर बोलत होते. तेवढय़ात शेतकरी येताच कृषीमंत्री संतापले. ‘मी कलेक्टरशी बोलतोय. चल हट, तू राष्ट्रपती आहे का? असे भदोरिया म्हणाले.

Team Global News Marathi: