रायगडावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी महादरवाजापासून स्वतंत्र मार्ग आखण्याचा निर्णय

 

कोल्हापूर | कोरोनाच्या दोन वर्षांनंतर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. प्रतिवर्षापेक्षाही यावेळी शिवभक्त प्रचंड संख्येने येणार असल्यामुळे रायगडावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी महादरवाजापासून स्वतंत्र मार्ग आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भारतीय शिवराज्याभिषेक समितीची राज्यव्यापी नियोजन बैठक सोमवारी पुणे येथे पार पडली. यावेळी राज्यभरातून शिवप्रेमी व जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीला संभाजीराजे यांच्यासह युवराज्ञी संयोगीताराजे तसेच शहाजीराजे उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर येता आले नाही त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील.

संयोगीताराजे म्हणाल्या, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता हा सोहळा शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक झाला पाहिजे. समितीच्या नियोजनानुसार गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. राजसदर फुलांनी सजवण्यात येणार असून भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधीवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. रोपवेसाठी दिव्यांग आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात यावे आणि शिवभक्तांनी पायी गडावर यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. गडावर मुबलक पिण्याचे पाणी असून आरोग्य नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहेत.

Team Global News Marathi: