“राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा

 

राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राजकीय नेत्यांमध्ये आक्रमक राजकारण पाहायला मिळत आहे. अशातच घोडेबाजार हा शब्दही चर्चेत आला आहे. राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडे किमान आवश्यक मते नसल्याने त्यांच्याकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप संजय राऊत आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे.राऊतांच्या या टीकेला भाजपचे नेते आशीष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“राज्यसभा निवडणुकीची पूर्ण आणि पूर्व तयारी झाली असून सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणारच आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच”, असा दावा भाजपचे नेते आशीष शेलार यांनी काल रोजी मुंबईतील भाजपच्या बैठकीनंतर केला.

“रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे बालीश आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम केले आहे. यासह राज्यात घोडेबाजार सुरू असल्याच्या राऊत यांच्या आरोपाचाही आशिष शेलार यांनी समाचार घेतला.

राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा”, असे आशिष शेलार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीसाठी काल (५ जून) रोजी भाजपची विशेष बैठक घेण्यात आलेली, ही बैठक मुंबईतील कार्यालयात पार पडल्यानंतर आशीष शेलार यांनी हे वक्तव्य केले.

Team Global News Marathi: