रात्रीच उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं, सकाळी लगेच हकालपट्टी कशी काय?

 

पुणे | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आढळराव पाटील यांनी नविर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. ही फेसबुक पोस्ट पक्षविरोधी असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आता पक्षाने केलेल्या कारवाईबाबत आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यावरुन सकाळी पक्षातून हकालपट्टी होईल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती असे शिवाजीराव आढळराव म्हणाले. नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेसबुकवरुन आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा’ अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. असा आशयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला आहे. मात्र हिच पोस्ट आढळरावांना चांगलीच भोवली आहे.

या शुभेच्छा दिल्यानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचं पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात तसं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे की बंडखोर एकनाथ शिंदे अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवणाऱ्यांना यातून कारवाईचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे आढळरावांची फेसबुक पोस्ट ही पक्षविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अगदी आज सकाळीच हे वृत्त समजल्याने आढळरवांना देखील धक्का बसला आहे.

Team Global News Marathi: