“राष्ट्रवादीने छू म्हटले की पोलीस शिवसैनिकांच्या मागे लागतात”; आढळराव पाटलांचा टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी स्थानिक राजकरणात या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता पुन्हा एकदा सेना नेत्यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे. “राष्ट्रवादी कॉंग्रेसने छू म्हटले की पोलीस शिवसैनिकांच्या पाठिमागे लागतात. त्यांनी कायद्याचं नव्हे, तर काय द्यायचं राज्य चालवलय. पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून सरकारी तिजोरीची लूट चालू आहे.

शिवसैनिकांना सन्मानाने जगू द्या. सहनशक्तीचा अंत झाला तर सरकारमधील सहकारी पक्ष का असेना त्यांच्याशी संघर्ष अटळ आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीरपणे इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही पक्षात वाद होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे

राज्यात शिवसेनेची शिवसंपर्क अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला जाहीर इशारा दिला आहे.

आढळराव पाटील यांनी सरकारमधील आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व गृहखात्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीला आम्ही घाबरत नाही पण त्यांच्या ताब्यात असलेल्या पोलिस खात्याकडून शिवसैनिकांना त्रास देण्याचा, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. पण, शिवसैनिकांनाही अन्याय सहन करण्याची सवय नाही, हे संबंधितांनी ध्यानात ठेवावे, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

Team Global News Marathi: