राणा दाम्पत्याला नागपुरात अटींचे पालन करून हनुमान चालिसा पठणाची परवानगी,

 

नागपूर | अपक्ष खासदार नवनीत राण आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना काही अटींवर नागपुरातील राम नगर मधील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, परवानगी देत असताना त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करूनच त्यांनी हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी राणा दाम्पत्याला नागपूर विमानतळावरुन मंदिरापर्यंत रॅली काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य ज्या मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार आहे, त्याच मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसने देखील हनुमान चालिसाचे पठण करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवनीत राणा यांना हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी वेगवेगळा वेळ दिला गेला आहे. उद्या दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे हनुमान चालिसा पठण होईल. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी वेळ दिला आहे. राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीला परवानगी देण्यात आली असली तरी दोन्ही पक्षांना अटी शर्थी घालण्यात आल्या आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला भोंग्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याबरोबरच दोघांनीही प्रक्षोभक वक्तव्य करु नये ही अट पोलिसांनी घातली आहे. ‘हनुमान चालिसा पठणाच्या नावाखाली राम नगर मधील हनुमान मंदिराला राजकीय आखाडा बनवू नये’ दरम्यान, राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणावरून रामनगर येथील हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीने टीका केली आहे.

Team Global News Marathi: