रामोशी समाजातील पहिली महिला झाली रिक्षाचालक

रामोशी समाजातील पहिली महिला झाली रिक्षाचालक

जिद्द,चिकाटी,नवनवीन करण्यासाठीची धडपड आणि परिस्थितीवर मात करीत आळंदीतील संगीता सुनील जाधव ही समाज प्रवाहापासून दूर असलेल्या रामोशी समाजातील पहिली रिक्षाचालक बनली आहे. तिची ही धडपड सर्व कर्तृत्ववान महिलांसाठी प्रेरक ठरणार आहे.

आज सर्वच क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. असंख्य स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. म्हणजेच स्त्री पुरूषाइतकीच निर्भय, कणखर, धैर्यवान आणि चिकाटीने त्या त्या क्षेत्रात कार्यशील आहे. असे असले तरी भारतीय संविधानाने स्त्रियांना समान हक्क दिला असला तरी, भटक्या विमुक्त जमातीतील स्त्रिया अजूनही विकासापासून वंचित आहेत.

महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या ४९ जाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. ‘रामोशी’ हा त्यातील एक मुख्य घटक. गावाचे रक्षण करणे, पिकांची राखण करणे ही या समाजाची मुख्य जबाबदारी होती. ब्रिटिश काळापासून या समाजाची वाताहत झाली आहे. उपजिविकेसाठी पारंपरिक व्यवसाय उरले नसल्याने मिळेल ते काम करणे हेच या समाजाच्या नशिबी आले आहे.

स्वातंत्र्यानंतर या समाजातील काही लोक उपजिविकेसाठी शहरात आले ते आज स्थिर आहेत. नवी पिढी शिक्षणाची कास धरून मार्गक्रमणा करताना दिसत आहे. जे गाव- खेड्यात राहत आहेत ते आजही वंचित आहेत. बहुतांश समाज बांधावाकडे ना हक्काची जमीन आहे ना घर. त्यातल्या त्यात महिलांच्या सबलीकरणाचा विषय म्हणावा तितका पोहोचला नाही. पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या स्त्रियांची जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. राजकीय उपेक्षा, रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या स्त्रियांची दैन्यावस्था अजूनही संपली नाही; दुसरीकडे स्वतःच्या विकासासाठी, आपले स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचे साहस काही महिला करत आहेत. पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील संगीता सुनील जाधव ही त्यातील एक धाडसी महिला. परिस्थितीशी दोन हात करणारी संगीता आज या समाजातील महिलांचे प्रतिनिधिक उदाहरण ठरली आहे.

२८ वर्षीय संगीताचे शिक्षण ९ वी पर्यंत झाले आहे. तिचे पती सुनील रिक्षाचालक आहेत. मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना होणारी आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन संगीता हिने संसाराची चाकरी स्वतःच्या हातात घेऊन आपल्या पतीच्या खांद्याला खांदा काम करू लागली आहे.

संगीता सांगते, “आमच्या अनेक पिढ्या आळंदीत राहत आहेत. आळंदीतील चाकण चौकात माझं घर आहे. आम्हाला जमीन नाही. घरात कोणी उच्च शिक्षण घेतलेलं नाही. त्यामुळं सरकारी नोकरीला लागलेलं नाही. पती सुनील याचं पाचवीपर्यंत शिक्षण झालं. ते रिक्षाचालक म्हणून काम करतात. माझं शिक्षण नववी पर्यंत झालं. आम्हाला दोन मुलं आहेत. लग्न झाल्यावर मी स्वतःचं घर चालावं म्हणून दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी,झाडलोट, स्वयंपाक करू लागली. मोठ्या मेहनतीनं काम करूनही या कामात समाधानकारक पैसे मिळत नव्हते”

याविषयी सांगताना संगीता म्हणाली, ” तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. मुलं लहानची मोठी होत होती. कर्ता पुरूषांच्या कष्टावर घरखर्च कठीण जात होतं. मी दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत नव्हतं. त्यामुळे नेहमी चिडचिड व्हायची. खूप अस्वस्थ व्हायचे.कंपनीत अथवा ऑफिसमध्ये कामाला लागावे असं मनात यायचं पण माझं पुरेसं शिक्षण ही झालं नव्हतं. आयुष्यात शिक्षण हे किती महत्त्वाचे असते, हे कुठं मला माहित होतं?

माझ्या आयुष्यात रिक्षाचालक होणं हेच लिहिलेलं होतं. मी रिक्षा चालवेन असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी जेव्हा रिक्षाचालक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पतीलाही(संजय) माझ्या धाडसाचे कौतुक वाटले. खरेतर, माझं बोलणं ऐकून ते रागवतील असं वाटलं होतं, पण पुरुषांच्या राज्यात एखादी महिला रिक्षाचालकाचा शिरकाव होत आहे याचा त्यांना आनंद झाला होता. त्यांच्याकडूनच मी रिक्षा चालवयाला शिकले. ते नेहमी म्हणायचे, “शिकताना घाबरायचं नाही. जे काही शिकायचं ते आत्मविश्वासानं.” त्यामुळं बघता बघता मी रिक्षा शिकले. मी रिक्षा शिकल्याचा आनंद माझ्या दोन मुलांना झाला. त्यानंतर काही दिवसांनी मला वाहन चालविण्याचा परवाना मिळाला.

या क्षेत्राने माझं अवघं जीवनच बदलून टाकलं. घरकामात व्यस्त असणारी बाई नीडरपणे बाहेर पडली. प्रवास खडतर होता. पण या प्रवासाने मला खूप काही शिकवलं.सुरूवातीला पती घरी आले की मी रिक्षा घेऊन बाहेर पडायचे आणि भाडे मारायचे. पिंपरी चिंचवड, आळंदी, देहू, चाकण परिसरात उद्योग कंपन्या असल्याने भाडे लागायचे. त्यामुळे ते रात्रीपर्यंत भाडे मारायचे. त्यामुळे मला दुसऱ्या रिक्षाची गरज भासू लागली. ते घेण्यासाठी गाठीला फार पैसा नव्हता. हात उसने करून पतीने मला दुसरी रिक्षा घेऊन दिली. प्रारंभी मी आळंदी शहरात फक्त महिलांची प्रवास वाहतूक केली. त्यातून दिवसाकाठी तीन-चारशे रुपये मिळू लागले. आज मी सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत रिक्षा चालवते.

आता शहरात माझी ओळख झाली आहे. शिकलेल्या बायका,नोकरदार महिला ‘ अरे व्वा, आपल्या आळंदीत महिला रिक्षा चालवत आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे, बरं तुमचं नाव काय?” म्हणून विचारपूस करतात.

अनेकजणी मला नावानिशी ओळखतात.अनेकांकडे माझा संपर्क क्रमांक आहे. त्यामुळं रिक्षाच्या माध्यमातून शहरातील पुरुष,महिला प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविण्याची सेवा बजावत आहे.

माझ्या या प्रवासात अनेकांनी मला प्रश्न विचारले. रात्री उशिरापर्यंत बाहेर असतेस? जर काही बरंवाईट झालं तर? कोणी फसवलं तर? असं रोज बोलणं माझ्या कानी पडत. यामुळं माझ्या मनात असे वेगवेगळे विचार पिंगा घालत पण मी नीडरपणे सामना करण्याचा निर्धार केला. या कामात माझ्या पतीची मोठी साथ लाभली.

माझं स्वतःचं अर्थकारण ज्ञान तसं तुटपुजं असलं तरी चाकोरी बाहेरीच्या जगानं मला खूप शिकवलं. मुसळधार पाऊस असो, खाचखळग्यांचा रस्ता असो, वादळी रात्री असो नाहीतर काट्याकुट्यांनी भरलेली वाट. या सर्व वाटेवर मी धीटपणे वावरले”

संगीता पुढे म्हणते,” व्यक्तीची ओळख ही नेहमी तिच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. माझ्या कामातून माझं कर्तृत्व सिद्ध करण्याचं प्रयत्न करत आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात मी मला जिकडं भाडे मिळेल तिकडं जात असते. आतापर्यंत पुणे, लोणावळा, सातारा इथेपर्यंतचे भाडे घेतले. कोणाची मदत न घेता, कुठलीही मोठी अपेक्षा न ठेवता दूरचा प्रवास मी यशस्वी करून दाखवले.आज माझ्या जीवनात आणि माझ्या कार्यात एवढा आनंद निर्माण झाला, तो केवळ रिक्षामुळेच.माझ्या पतीमुळेच मी एक जबाबदार नागरिकांची कर्तव्य बजावत आहे, याचा मला अभिमान वाटत आहे.”

रिक्षाचालक होण्याचा पेशा पत्कारला त्याबद्दल तिला कमीपणा अथवा अशक्य कोटीतील वाटत नाही. या कामाचा तिला अभिमान वाटतोय. स्वाभिमानाने, समाधानाने आणि आनंदाने जगणे तिला जास्त आवडते. या कामातून तिला समाधानकारक पैसे मिळताहेत. त्यातून तिचा नेटाने संसार सुरू आहे.

टाळेबंदीमुळे कोणत्या समस्यांना सामोरं जावे लागत आहे? याबद्दल सांगताना संगीता म्हणाली,”आधीच्या लॉकडाउनमुळे लोकांवर आर्थिक, मानसिक परिणाम झाला आहे. त्यात पुन्हा लॉकडाउन लागू झाल्यामुळे याचे परिणाम आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या चालेल्या जीणघेण्या खेळामुळे आमची अजूनही गाडी रूळावर आलेली नाही.आज असंख्य रिक्षाचालकांना घराचे, गाडीचे हप्ते भरणेही शक्य नाही.त्यामुळे असंख्य रिक्षाचालकांसमोर जगावे की मरावे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माणसाची परिस्थिती कशीही असो त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याचे ध्येय नक्की गाठू शकतो, आता हीच गोष्ट संगीता जाधव हिच्या रूपाने पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. एकूणच संगीताची ही छोटीशी कथा अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे.

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
स्थळ : देहू आळंदी जि.पुणे

ग्लोबल न्युज नेटवर्क: