राज्यसभेसाठी उद्या मतदान, महाविकास आघाडीचे पारडे जड

 

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसा महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱया अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांची संख्या वाढत आहे.


समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच पारडे अधिकच जड झाले आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱया सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे.

राज्यसभेच्या या निवडणुकीत शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण महाविकास आघाडीकडून चार तर भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपचे दोन तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार आहे.

महाविकास आघाडीकडे असलेली अतिरिक्त मते व आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाबाहेरून आलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. खोत, मेटे यांच्यासारख्या मित्र पक्षांनाही डावलण्यात आले. यावरून भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी वाढत दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि छोटय़ा पक्षांना भाजप नेत्यांनी कितीही गोंजारण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने पक्षांतर्गत नाराजी भाजपला अधिक भोवण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: