राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंना धक्का

 

राज्यसभा निवडणुकीसाठी सहावे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे म्हटले जात असले तरी त्या बाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यातच शिवसेनेने सहावी जागा लढविण्याची घोषणा केल्याने बिनविरोध निवडून येण्याच्या संभाजीराजेंच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीकडील अतिरिक्त ११ मते संभाजीराजे यांना देण्याचे सूतोवाच शरद पवार यांनी केले होते. तथापि, दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने आम्हाला मदत केली होती. यावेळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्षांकडील अतिरिक्त मते लक्षात घेऊन कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना पाठिंबा मिळण्याबाबत संभ्रम आहे. त्यातच सहावी जागा शिवसेना लढणार असल्याचे मंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्याने शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्षांना विश्वासात न घेता परस्पर संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेता कामा नये, असे शिवसेना आणि काँग्रेसच्याही नेतृत्वाला वाटते. त्यामुळेच शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिल्याच्या वृत्ताने अस्वस्थता आहे. शिवसेनेने स्वत:चा उमेदवार उभा करावा आणि राष्ट्रवादीने अतिरिक्त मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला देऊन आघाडीधर्म पाळावा. काँग्रेसकडील दोन अतिरिक्त मते आणि अपक्षांच्या बळावर आपला दुसरा उमेदवार निवडून येऊ शकतो, असा तर्क शिवसेनेत दिला जात आहे.

Team Global News Marathi: