राज्यात राजकीय घडामोडींना वेग, तर मनसेची टिपण्णी

 

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अश्यात मनसेकडून एक मिश्किल टिपण्णी करण्यात आली आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ‘रानबाजार’ अशी टिपण्णी पानसे यांनी केली आहे. सध्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल होते. ते भाजपमध्ये जातील, असं बोललं जातंय. पण सध्या ते शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आल्याचं बोललं जातंय. भाजपसोबत जाण्यासाठी ते आग्रही असल्याचं बोललं जातंय. अश्यात मनसेने ही टीपण्णी केली आहे.रानबाजार ही राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी वेब सिरीज आहे. प्लॅनेट मराठीवर ही सिरीज प्रदर्शित झाली. ही वेब सिरीज राजकारणात पडद्यामागे काय काय सुरू असतं, त्यावर भाष्य करते. ही वेबसिरीज अभिजित पानसे यांनीच दिगदर्शित केलेली आहे.

शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी तडजोडीकरिता मोठा प्रस्ताव ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बंड करून सूरतला पोहोचलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर तीन प्रस्ताव ठेवले आहेत. हे प्रस्ताव शिवसेनेनं मान्य केले तरच आपली नाराजी दूर होईल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे.

एकनाथ शिदे यांच्या संपर्कात राज्यभरातील अनेक आमदार असून काही आमदार सूरतमध्ये तर काही मुंबई आणि परिसरात असल्याची चर्चा आहे. कालच्या विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आलंय. आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठेवलेल्या प्रस्तावावर विचार केला जाईल का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Team Global News Marathi: