राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘राँग बॉक्स’मध्ये पहिल्यांदाच!

 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणासाठी आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन मिनिटांचे भाषण करून निघून गेले.ही अभूतपूर्व घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पूर्वी कधी घडलं नव्हतं. यापूर्वी एकदा विद्यासागर राव राज्यपाल असताना त्यांना विधानभवनच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती. तथापि, राज्यपालांनी अभिभाषण संपवून निघून जाण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला. विधान परिषदेचे सभापती अन् विधानसभेचे उपाध्यक्षदेखील लगोलग निघून गेले.

कोणाच्या गोंधळामुळे राज्यपाल निघून गेले, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यपालांनी पळ काढला, असं सत्तापक्षाचं म्हणणं आहे अन् राज्यपालांचं अभिभाषण बिनधोक व्हावं, याची जबाबदारी सरकारची होती, असं भाजपचं म्हणणं आहे.महाविकास आघाडी सरकारला विविध पद्धतीने अडचणीत आणण्याची भूमिका घेणारे राज्यपाल पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राॅंग बॉक्समध्ये गेले आहेत.

एका विधानाने त्यांनी आघाडी सरकारमधील पक्षांना त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडण्याची संधी दिली. राज्यपालांविषयीचा राग यानिमित्तानं महाआघाडी काढत आहे. संयुक्त सभागृहात भाषण न देता त्यांनी निघून जावं, असा अभूतपूर्व गोंधळ सभागृहात सुरू नव्हता. तरीही राज्यपालांचं असं अचानक निघून जाणं आश्चर्यकारक होतं. यापूर्वीही राज्यपालांच्या अभिभाषणात घोषणाबाजी झाली होती, पण त्यावेळी राज्यपाल असे भाषण सोडून निघून गेले नव्हते. गोंधळ वाढत जाईल आणि काहीतरी आक्रित घडू शकते, अशी शंका कोश्यारी यांना असावी हीदेखील शक्यता आहे.

Team Global News Marathi: