राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार

 

नागपूर \ राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. महत्वाच्या विविध मुद्दय़ांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी असल्यामुळे आजचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.

तसेच लोकायुक्त कायद्याचं बिल देखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. अर्थात त्यांच्या सोबतील नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असणार आहेत. मात्र अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत. नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे.

नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ही आज बैठक होणार आहे, तसेच उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे. असेही सांगितले.

 

Team Global News Marathi: