राजर्षी शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्या भाजपला पराभूत करा 

 

राजर्षी शाहूंच्या विचारांना विरोध करणार्‍या भाजपला तीन पक्षांनी एकत्र येऊन आम्ही सत्तेपासून दूर ठेवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत तुम्ही आम्हाला साथ द्या. राजर्षींच्या विचारांना विरोध असणार्‍यांना त्यांची जागा दाखवा आणि महाविकास आघाडी भक्कम करा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चंद्रकांत जाधव यांचे अपुरे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भाजपच्या वतीने सातत्याने प्रयत्न केला जातो. परंतु, सरकार पाडण्यासाठी जेवढे प्रयत्न करतील तेवढी महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करत थोरात म्हणाले, काँग्रेसच्या काळात महागाईच्या नावाखाली ऊठसूट रस्त्यावर उतरणारे भाजपचे कार्यकर्ते आज महागाईचा आगडोंब उसळला असताना कोठे लपून बसले आहेत? याचा जाब मूळ गाव सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना विचारावा.

महाविकास आघाडी सरकार एक-दोन महिन्यांत पडेल, असे त्यांना वाटत होते. त्यानंतर भाजपने सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रोज एक नवीन मुहूर्त शोधू लागले. सरकार पाडण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर करून छापे टाकण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांच्या कुटुंबांनादेखील त्रास दिला जात आहे. परंतु, त्यांनी काही केले तरी महाविकास आघाडीचे सरकार यापुढेही अधिक मजबुतीने काम करेल.
चंद्रकांत जाधव यांची सामान्य माणसाशी नाळ कायम राहिली. तळमळीचा कार्यकर्ता अचानकपणे आपल्यातून निघून गेला. त्यांचे राहिलेले अपूर्ण काम पुढे नेण्यासाठी जयश्री जाधव यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. त्यांना निवडून देऊन महाविकास आघाडीचा १७१ चा आकडा कायम ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जाधव यांना बिनविरोध करून भाजपने मोठे मन दाखवावयास हवे होते; पण त्यांनी ते दाखविले नाही. समतेचा संदेश देणार्‍या राजर्षी शाहूंचे विचार नाकारणार्‍या भाजपला कोल्हापूरची जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: