राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी ठाकरे सरकारने दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली

 

पुन्हा एकदा शिंदे सरकारने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीदिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचं पत्र दिलं आहे.

12 नोव्हेंबर 2020 मध्ये ठाकरे सरकारनं 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्याचं पत्र शिंदे सरकारनं दिलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार-चार अशी 12 जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी पाठवण्यात आली होती. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांचं नाव होतं तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचं नाव देण्यात आलं होतं. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांचं नाव पाठवण्यात आलं होतं. यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली आहे तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे.

Team Global News Marathi: