राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयानेमोठा निर्णय दिला आहे. राजद्रोहाच्या कलमाला तूर्तास स्थगिती देण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता नव्याने कोणावरही राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. मात्र, राजद्रोहाचे जुने खटले सुरु राहतील.

आजच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती देणे हे अयोग्य ठरेल, असे सांगत हे कलम रद्द करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या कलमाबाबत असलेली संदिग्धता दूर होईपर्यंत या कलमाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडच्या काळात अनेकांनी राजद्रोह कलमाच्या व्यवहार्यतेविषयी शंका उपस्थित केल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राजद्रोहाच्या कलमात एकतर सुधारणा कराव्यात किंवा हे कलमच रद्द करावे, असे मत मांडले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत दूरगामी परिणाम ठरणारा ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे केंद्र आणि राज्य सरकारला राजद्रोहाच्या १२४ अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यास मज्जाव असेल. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १२४ अ कलमातील तरतुदींमध्ये सुधारणा किंवा पुनर्विचार करण्याची मुभा दिली आहे.

Team Global News Marathi: