राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

 

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सभा घेण्याची घोषणा केली होती. मनसेकडून या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून दुसरीकडे मात्र सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत.

औरंगाबात पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.औरंगाबाद पोलिसांकडून शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) आणि (३) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी एक पत्रकही काढले आहे.

औरंगाबाद शहरात राजकीय पक्ष व इतर संघटनांतर्फे निरनिराळ्या मागण्यांसाठी आंदोलन तसेच कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मनसेकडून मंदीरासमोर हनुमान चालिसा पठन करण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मनसेच्या या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचा व संघटनांचा विरोध असल्यामुळे शहरात त्यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Team Global News Marathi: