अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं ना मग भोगा आता, राज ठाकरेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं ना मग भोगा आता, राज ठाकरेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली होती. हाच धागा पकडत राज यांनी आज उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. ‘माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवतीर्थावर पार पडलेल्या मेळाव्यात राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील सुरु असलेल्या धाडीपर्यंत सर्वच मुद्द्यांवर भाष्य केलं. राज यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं.

उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता आयकर विभागानं सील केलीय. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली होती. हाच धागा पकडत राज यांनी आज उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. ‘माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

‘राजकारण तुम्हाला करायचं असेल तर समोरच्यांनाही येतं’

राज ठाकरे म्हणाले की, ‘त्या दिवशी मुख्यमंत्री विधानसभेत ठणकावून सांगत होते की, माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून. पालिकेचे व्यवहार बघायचे. यांना ईडीची नोटीस आली. मलाही आली. गेलो ना. यांना चार महिन्यापूर्वी आली, गेले नाही. संपत्ती जप्त केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा म्हणतात कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा. हे सर्व 2019चं आहे. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं ना मग भोगा आता. राजकारण तुम्हाला करायचं असेल तर राजकारण समोरच्या लोकांनाही येतं. या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवलाय.

हल्ली आई-वडील म्हणतात ‘यशवंत जाधव’ हो!

यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने रेड टाकली. दोन दिवस रेड होती. मोजत काय होते? हल्ली आई-वडील यशवंत हो सांगत नाही. तर यशवंत जाधव हो असं सांगतात. पालिकेत खा खा खाल्ले ते पैसे कुठे आहेत? व्हॉट्सअॅपवर जुन्या मुंबईचे फोटो येतात किती सुंदर वाटते. बीएसटीचा रंग बदलला. लोकं कसे चढतात, घाटकोपरला चाललोय कि अहमदाबादला हेच कळत नाही. याचं कारण तुम्ही आहात, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केलीय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: