पाऊस थकला वारकरी नाहीत ,सलाम वारकरी माउलींना

🚩 *माझी पंढरीची वारी* 🚩
वाखरी ,०८ जुलै २०२२
*_सतीश मोरे _*

पाऊस थकला वारकरी नाहीत ,सलाम वारकरी माउलींना !

माऊली सोहळा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आज ८ जुलै भंडीशेगावमध्ये आमचा मुक्काम होता. दुपारी एक वाजता सोहळा वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होणार होता. काल रात्री डॉ साळुंखे या मित्रांच्या निवासस्थानी आम्ही मुक्काम केला होता. डॉक्टरांचे वडील साळुंखे सर म्हणून ज्ञात आहेत. खुप छान पाहुणचार केला या कुटुंबियांनी. सकाळचे विधी आटोपून शेजारीच असणाऱ्या पालखी तळावर आमच्या बारा नंबर दिंडीमध्ये पोहोचलो. आज तीर्थ स्वरूप परमपूज्य भगवान मामा कराडकर यांची पुण्यतिथी. भगवान मामांनी मारुती बुवा कराडकर मठासाठी फार मोठे योगदान दिले आहे.

भगवान मामा यांच्यामुळेच कराडकर मठाची ख्याती राज्यभर पोहचलेली आहे. मारुती बुवा कराडकर मठाची पताका उंच उंच करत मामांनी मठाची प्रतिष्ठा वाढवली. पंढरीची वारी सुरू असतानाच भगवान मामांनी याच दिवशी देह ठेवला होता. मामांच्या पुण्यतिथीनिमित्त बारा नंबर दिंडीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. भजन कीर्तन झाल्यानंतर फुले पडली आणि भगवान मामांच्या फोटोला मान्यवरांनी हार घातले, वंदन केले, अनेकांनी मामांच्या आठवणी जागवल्या. भगवान मामांना आवडीच्या गुलाबजाम तसेच कुर्मा पुरी, भाजी,भात असं मिष्ठान्न देण्यात आले.

भंडी शेगाव ते वाखरी हे अंतर आठ किलोमीटर असल्यामुळे आज दुपारी एकच्या सुमारास माऊलींची पालखी इथून निघणार होती. माऊलींच्या पालखी बरोबरच म्हणजे दुपारी वाखरीच्या दिशेने चालावयास सुरुवात केली. माऊलींची पालखी आमच्या पाठोपाठच होती. संपूर्ण रस्त्याला दोन्ही बाजूने वारकऱ्यांची फार मोठी गर्दी होती. आता पंढरी जवळ आली असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ अजुनच लागली होती. वारकरी चालत होते. अनेकांना वाखरी येथे होणाऱ्या गोल रिंगणाची प्रतीक्षा होती. पुढे जाऊन गोल रिंगण पाहण्यासाठी बसायला जागा मिळावी म्हणून अनेक वारकरी गडबडीने पुढे जात होते.

वातावरण ढगाळ होतं. गरम व्हायला लागलं होतं. भंडीशेगाव सोडून साधारण दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर दीडच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. संपूर्ण आकाश भरून आलं आणि रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला. नंतर पावसाचा जोर वाढला. सुरुवातीला काही वारकरी पाऊस कमी आहे म्हणून त्याचा आनंद घेत होते. मात्र नंतर जोराचा पाऊस सुरू झाल्यानंतर वारकऱ्यांनी जवळचा आडोसा घेतला. आपणास मुद्दामून सांगायचा सांगितले पाहिजे की हे वारकरी मोकळ्या समाजातील होते, त्यामुळे त्यांना कुठेही थांबायची परवानगी होती. मात्र पाठीमागे असणारे माऊलीच्या सोहळ्यातील वारकरी मात्र या पावसात चिंब होऊन पुढे जात होते.

आम्ही एका झाडाखाली आसरा घेतला. मात्र पावसाचा जोर वाढला त्यामुळे पुढे एका चहाच्या टपरीच्या प्लास्टिकच्या कागदाखाली थांबलो. या छोट्याशा प्लास्टिकच्या कागदाखाली आम्ही किमान 50 लोक कसे होतेबसे उभे होतो. एकाने तो कागद मध्यभागी काठीने उंच धरला होता. मला तो गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा कृष्ण भासत होता. अर्धा तास पाऊस चालू होता.थोड्यावेळाने पाऊस उघडला मात्र तोवर आमच्यापैकी बरेच जण कमी जास्त प्रमाणात भिजलेले होते. चहा पिऊन तेथून पुढे आम्ही चालत राहिलो.

पालखी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. सहापदरीकरण पुर्ण झाल्यामुळे एका बाजूने वारकरी चालत होते. दुसऱ्या बाजूने वाहने चालत होती. दोनच्या सुमारास आम्ही बाजीराव विहीर येथील लांब उंच फ्लाय ओव्हर ब्रीज वर आलो. नुकतेच या चौपदरी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते. या पुलाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या रिकाम्या जागेत माऊलींच्या सोहळ्यातील सर्वात मोठे चौथे गोल रिंगण होणार होते. या रिंगणासाठी अजून वेळ होता. अजून माऊली पालखी दोन तास पाठीमागेच होती. मात्र तरीही संपूर्ण मैदान खचाखच भरलेले होते. मिळेल त्या जागेवर,जागा मिळेल तिथे वारकरी बसलेले होते. माऊलींची प्रतिक्षा करत होते. दरम्यान उघडलेला पाऊस पुन्हा सुरू झाला. आज पाऊस आणि वारकरी यांच्यात लपंडाव सुरू होता. हा गोल रिंगण काळ्या शेतात होणार होते. पावसामुळे या जमिनीवर संपूर्ण चिखल झालेला होता. त्यातच दाटीवाटीने अनेक वारकरी उभे राहिले होते, काही बसले होते. सर्वात मोठ्या रिंगण पाहण्यासाठी राज्यभरातील अनेक भाविक आले होते.

सर्वांना प्रतीक्षा माऊलींच्या पालखीची होती. आम्ही या मैदानावर खाली जाणे ऐवजी उंच पुलावर थांबणं पसंत केले, येथूनच सुंदर दृश्य दिसत होते. या पुलावर पालखी सोहळा पत्रकार संघाची एक गाडी होती. पालखी सोहळा कव्हर करणारे फोटोग्राफर, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना नेआण करण्यासाठी या गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये जाऊन बसलो. पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे आणि त्यांच्या सहकार्यासोबत सुमारे दीड तास आम्ही या जीपमध्ये बसून होतो. बाहेर पाऊस पडत होता. पत्रकार मित्रांनी आणलेल्या शेंगदाणे, शेंगा यांचा आस्वाद घेतला. बाहेर वारकरी डोक्यावर प्लास्टिकचा कागद घेऊन माऊलींची वाट पाहत होते.

चारच्या सुमारास माऊलींचे बाजीराव विहीर येथे आगमन झाले आणि सर्वांनी माऊली माऊली असा जयघोश केला. या ठिकाणी सुरुवातीला रस्त्यावर माऊली पालखी सोहळ्याचे उभे रिंगण झाले आणि माऊलींची पालखी रिंगण तळावर दाखल झाली. या दरम्यान रिंगण तळावर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील समोरील 27 दिंड्या आणि त्यातील वारकरी पोचले होते तर माऊलींच्या पाठोपाठ असणारे मानाच्या 27 दिंड्यातील वारकरी टाळकरी झेंडेकरी एका मागे एक येत होते. सर्वांचा उत्साह वाढलेला होता. वरून पाऊस पडत होता. खाली पायात चिखल होता. मात्र याचा कसलाही परिणाम वारकऱ्यांवर होत नव्हता. पाऊस आणि वारकरी यांची जणू काही शर्यतच लागलेली होती. माऊलींच्या पालखीने आता पूर्ण रिंगणाला वेढा घालून ही पालखी पुढे जाऊ लागली. पालखीच्या पाठोपाठ एका मागोमाग एक दिंड्या माऊलींना नमस्कार करण्यासाठी येत होत्या.

साडेचार वाजता माऊलींची पालखी रिंगणाच्या मधोमध ठेवण्यात आली. आता सर्वांना प्रतीक्षा होती रिंगणाची. पुन्हा पाऊस सुरू झाला. रिमझिम पावसात वारकऱ्यांनी पुन्हा फेरा धरला. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सुरू झाला. वारकऱ्यांचे खेळ सुरू झाले. उडीचे खेळ, कबड्डी, कुस्ती, दहीहंडी असे खेळ खेळत वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. दरम्यान गोल रिंगण लावून तयार झालेले होते. चोपदारांच्या सूचनेनंतर माऊलींचा अश्व पुढे धावू लागला तर आणि त्या पाठोपाठ या घोडेस्वार अश्व धावू लागला. या दोन्ही अश्वानी पूर्ण रिंगणाला दोन वेढे घातले आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल जयघोष झाला. हे महा गोल रिंगण पार पडले. याची डोळा यांची देहा असा सुंदर सोहळा वारकऱ्यांनी पाहिला.

याच दरम्यान आम्ही ज्या पुलावर उभा होतो त्या पुलावरून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निघाला होता. आमचे नशीब म्हणा किंवा माऊलीची कृपा म्हणा समोर एका बाजूला माऊली होत्या आणि आमच्या शेजारून संत तुकाराम महाराज माऊली निघाले होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज माऊली सोहळा पालखी सोहळ्यातील दिंड्या एका मागोमाग एक पुढे जात होत्या. मी लगेच तिथून पुढे या पालखी सोबतच निघालो. या पुलावरून खाली गेल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी थांबला. पुढे गेलो, खुप गर्दी होती. मात्र रिंगण लागेपर्यंत आमच्यासाठी काही क्षण मोकळं करून दिलं होतं.संत तुकाराम महाराजांचे पादुकांचे अत्यंत जवळून दोन तीन वेळा दर्शन घेण्याच्या योग आम्हाला आला.

मी नेहमी म्हणतो, नशीब माझ्यावर नेहमी फिदा आहे, मी मागेल त्या गोष्टी माऊलींनी मला दिल्या आहेत.. सकाळपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे जवळून दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. माऊलींनी ती इच्छा पूर्ण केली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख तात्या मोरे माऊली यांची माझी जुनी ओळख आहे. मात्र बरेच दिवस त्यांना भेटलो नव्हतो. आज माऊलींच्या रथामध्ये तात्या मोरे माऊली मला भेटले. संत तुकाराम महाराज माऊली पालखी सोहळ्यासाठी पुढच्या वर्षी नक्की या असे त्यांनी मला निमंत्रण दिले. माऊलींचे दर्शन घेतले, मोरे माऊली यांच्याकडून श्रीफळ देऊन आमचा सत्कार करण्यात आला.

यादरम्यान उभ्या रिंगणाची तयारी पुर्ण झाली होती. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्व तयार होते. सुमारे अर्धा किलोमीटर लांब असे उभे रिंगण लावण्यात आले होते. सुरुवातीला माऊलींचा अश्व धावत धावत आला. वारकऱ्यांनी यावेळी माऊलींचा नामाचा जयघोष केला. माऊलींच्या अश्वाने येऊन संत तुकाराम महाराज माऊलींच्या पादुकांना नमस्कार केला. त्यानंतर घोडेस्वार असलेला दुसरा अश्व आला त्यांनीही उभे रिंगण धावत गेले. याही आश्वाने परत येऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. अतिशय सुंदर असा तो क्षण होता. मी अतिशय जवळून तो क्षण पाहत होतो. (या सर्व सोहळ्याचे जवळून व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढारी ऑनलाईन वर उपलब्ध आहे.) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अतिशय शिस्त होती हे मला या निमित्ताने पुन्हा मुद्दामहून सांगावेसे वाटते. माझा आनंद गगनात मावत नव्हता.

काही वेळापूर्वी सुरू असलेला पाऊस थांबला होता. मात्र रान काळे असल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर अक्षरशः चिखल झाला होता. रबडी तयार झाली होती. या चिखलातून रबडीतून वारकरी चालत होते, नाचत होते, खेळत होते. मला खरंच वारकऱ्यांचं आश्चर्य वाटत होतं. दुपारपासून हे वारकरी टाळ वाजवत चालत आहेत, माऊलींचा जयघोष करत आहेत, पावसात भिजत आहेत, मात्र तरीही त्यांना थकवा आलेला नव्हता. पाऊस दमला होता मात्र वारकरी दमले नव्हते. कोणीही पावसाची तक्रार करत नव्हते. माऊलींच्या सोहळ्यात पाऊस येतोच आणि हा पाऊस आम्हाला आनंद देऊन जातो, असे वारकरी बोलत होते.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा समवेत पुढे वाखरीपर्यंत मी चालत राहिलो. एक वेगळा अनुभव होता तो. आळंदीपासून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सोहळ्यासोबत पायी वारी केली होती. आता शेवटच्या टप्प्यात वाखरीपासून पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोबत. अतिशय सुंदर असा योग होता. वाखरी मध्ये सर्व संतांच्या पालख्या एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी फार मोठी गर्दी असते. कुणाची दिंडी कुठली आहे हेच कळत नाही. अजून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पाठीमागेच होता. सातच्या सुमारास संत तुकाराम महाराज सोहळा वाखरी येथे पोहोचला.

आम्ही आमच्या बारा नंबर तंबूमध्ये पोहोचलो. जाताना चिखलातून कसे बसे पाय टाकत होतो. या ठिकाणची परिस्थिती फार गंभीर अशी होती. आमच्या तसेच शेजारच्या दिंडी मधील तंबूमध्ये सगळीकडे चिखल झालेला होता. या चिखलातच उभ्या केलेल्या ट्रकच्या शेजारी स्वयंपाक करण्याचे काम चालू होते. अनेक वारकरी तंबूत शिरलेले पाणी बाहेर काढत होते. जागा सुकवायचा प्रयत्न करत होते. आसपासच्या सर्व दिड्यांमध्ये हीच परिस्थिती होती. अजून माऊली इथे पोहोचलेले नव्हते. रिमझिम पाऊस सुरूच होता. माऊलीच्या सोहळ्यात काम करणारे सेवेकरी आणि स्वयंपाक करणारी लोक या ठिकाणी अतिशय अडचणीत बसून काम करत होते. मात्र कुणाच्याही चेहऱ्यावर प्रतिकूल परिस्थितीचा कसलाही लवलेश नव्हता.

तासभर आम्ही तिथेच गाडीमध्ये दाटीवाटीने बसून राहिलो. वाखरी येथे प्रत्येक वर्षी आल्यानंतर सर्व संतांच्या पालख्यांचे दर्शन घ्यायचे असते. सर्व संतांच्या पालख्या तळावर एका ठिकाणी विसावलेल्या असतात. रिमझिम पावसातच आम्ही पालखी तळावर जाऊन संत तुकाराम महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. कोळे कराड येथील संत गाडगेबाबा पालखी या ठिकाणीच विसावलेली होती. तेथे कराडचे अनेक लोक भेटले. संत गाडगेबाबा पालखीचे दर्शन घेतले. भर पावसात पुन्हा भिजत आणि आमच्या तंबूच्या ठिकाणी आलो.

नऊच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वाखरी येथे आगमन झाले. समाज आरती संपल्यानंतर साडेनऊ वाजता पालखी सोहळ्यातील आमच्या बारा नंबर दिंडीतील सर्व वारकरी दिंडेकरी झेंडेकरी पोहचले. या सर्व लोकांना जेवण अग्रक्रमाने द्यायची जबाबदारी होती. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता मात्र दुसरा पर्याय नव्हता. सर्वांना जोराची भुक लागली होती. शेवटी भूपे सिस्टीम लावण्यात आली. भर पावसात भिजत भिजत वारकरी ताट घेऊन भोजन तंबू जवळ आले.

शेवयाची खिर, लाडु चपाती भाजी, भजीचा बेत होता. पण जेवण हातात घेऊन कुठे बसायचं हा प्रश्न होता. दलदलीमुळे कुठे बसता येत नव्हते. पायाला चिखल लागलेला होता, मांडी घालून बसता येत नव्हते. अशा परिस्थितीत अनेक वारकऱ्यांनी उभे राहून भर पावसात जेवण करणे पसंत केले. अपुऱ्या जागेत कुठेतरी आडोसा बघून महिला वर्गाने जेवण आटोपलं.

एक अतिशय वेगळा असा अनुभव आज मला अनुभवायला मिळाला. कसल्याही परिस्थितीत कुठलाही वारकरी दमला नाही, थकला नाही. परिस्थितीला सामोरे गेला. जे आहे त्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला सांभाळून घेतले. बराच वेळ पाऊस पडत होता, मात्र पावसाविषयी, व्यवस्थेविषयी कुणीही तक्रार केली नाही. सगळ्यांच्या अंगात एक वेगळा उत्सवा संचारला होता. सर्वांच्यामध्ये माऊली नावाची ताकद होती. कुणालाही कसलाही त्रास झाला नाही.थोडी गैरसोय झाली मात्र कुणीही याबाबत कुणाकडेही कुरबुर केली नाही. ‘अरे वारकऱ्या तुला नाही उन वारा सर्दी, आली पंढरीची वारी’ .वारकऱ्यांच्या या चिकाटीला, सहनशक्तीला, संयमाला खरंच लाखो वेळा सलाम करायचा वाटतो.

जेवण झाल्यावर आता झोपायचे कुठे हा प्रश्न होता. दहा वाजले होते. पंढरी सहा किलोमीटर अंतरावर होती. पाऊस कमी झाला होता,पण चिकचिक सुरू होती. चलो पंढरी राम कृष्ण हरी म्हणून तयार झालो….

भेटी लागी जीवा
लागलीसी आस !

राम कृष्ण हरी..

*_सतीश मोरे सतीताभ_*

ग्लोबल न्युज नेटवर्क: