राहुल गांधींची आज शेगावमध्ये जाहीर सभा, तर मनसे दाखवणार काळे झेंडे

 

शेगाव | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा 72 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 12 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. सकाळी सहा वाजता अकोल्यातील कुपट बाळापूर येथून पदयात्रेला सुरूवात झाली असून, यात्रा आता बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील आज राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेमध्ये भाग घेतला. दरम्यान, दुपारच्या सत्रात चार वाजता शेगाव इथं गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनीकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Team Global News Marathi: