आदर्श गाव पाटोदा मध्ये भास्कर पेरे-पाटलांना धक्का; मुलीसह पॅनेलचा पराभव

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव समजले जाणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये (Patoda Gram Panchayat) आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील (Bhaskar Pere Patil) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पाटोद्यातील लोकशाही ग्रामविकास पॅनेलने इथे दणदणीत विजय मिळवला आहे.

यावेळी या पॅनेलने भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील यांचाही पराभव केला. हा पराभव केल्यानंतर अनुराधा पेरे पाटील (Anuradha Pere Patil) यांनी लोकशाही मध्ये हार-जीत होत असते यापुढेही मी नव्या जोमाने काम करेन असा विश्वास व्यक्त केला. (How Bhaskar Pere Patil lost in Patoda Gram Panchayat Election)

आदर्श गावचे आदर्श सरपंच अशी ओळख असलेले भास्कर पेरे हे उमेदवार नव्हते. या गावात यंदा त्यांचं पॅनेलही नव्हते. त्यांची मुलगी अनुराधा ही अपक्ष निवडणूक लढवत होती. त्यांचा पराभव झाला. भास्कर पेरे यांच्या मुलीचा पराभव म्हणजे भास्कर पेरेंचाच पराभव अशी चर्चा पंचक्रोशीत आहे. मात्र विरोधी पॅनेलचे प्रमुख कपिंद्र पेरे यांनी हा भास्कर पेरेंचा पराभव नाही असं म्हटलंय.

कपिंद्र पेरे म्हणाले, “हा भास्कर पेरे पाटलांचा पराभव नाही, हा तरुणांचा विजय आहे. भास्कर पेरे पाटलांनी पूर्ण पॅनेल उभं केलं नव्हतं, मुलगी उभी होती. ती अपक्ष होती”.

भास्कर पेरे पाटील हे 25 वर्षे सरपंच राहिले, तरीही मुलीचा पराभव झाला, याबाबत कपिंद्र पेरे म्हणाले, ते लोकांचं मत आहे. बदल हा गरजेचा असतो, त्यानुसार हा बदल झाला. भास्कर पेरे यांना निष्क्रिय म्हणता येणार नाही, असं कपिंद्र पेरे यांनी नमूद केलं.

हे गाव शंभर टक्के आदर्श राहील, तरुण पिढी चांगलं काम करुन दाखवेल, आम्ही सर्वांना सोबत घेऊ, असा विश्वास कपिंद्र पेरे यांनी व्यक्त केला. भास्कर पेरे पाटील यांचं स्थान पूर्वी होतं तसंच राहील, त्यांचं मार्गदर्शन घेऊ, त्यांनी दिलं तर चांगलं होईल, त्यांच्या विचाराने वाटचाल करु, असंही कपिंद्र म्हणाले.

‘ती माझीच मुलगी’

दरम्यान या निवडणुकीत कपिंद्र पेरे यांच्या पॅनेलकडून पुष्पा पेरे यांनी विजय मिळवला. याबाबत पुष्पा पेरे म्हणाल्या, “मी पाच वर्ष सदस्य होते, अनुराधा ही माझीच मुलगी, ती जिंकली काय आणि मी जिंकली काय यामध्ये कुणाचा पराभव नाही. पाच वर्षात कामं झाली, आता आणखी चांगली कामं करु”

11 पैकी 8 जागा बिनविरोध 

या वर्षी पोटोदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. कारण यावेळी भास्करराव यांच्या विरोधात पॅनल उभे केले होते. एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक लागली होती.  तब्बल 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनेलचा विजय झाला.

पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

पाटोदा येथे भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा पराभव झाला. त्यांना निवडणुकीत 186 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी 204 मतं मिळवत निवडणूक जिंकली.

मागील कित्येक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेली आहे. या काळात त्यांनी पाटोदा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली होती. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा समाना करावा लागला. भास्कर पेरे 30 वर्षांनंतर गावाच्या राजकारणातून निवृत्त झाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: