पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

 

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने आज बुधवार आणि उद्या गुरूवारी सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे.गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास आणि जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

काही भागामध्ये वीजेचा पुरवठा खंडीत होत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अडथळा येत आहे. सलग पाऊस सुरू असल्याने या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून विद्यापीठाने आज बुधवार, उद्या गुरूवार रोजी होणाऱ्या बी. कॉम., बी. ए., एम. ए., एम. कॉम., बी. व्होक, आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या.

या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

Team Global News Marathi: