पुण्यात अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जागेत अतिक्रमण करून खोदकाम, शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

 

पुणे | अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या खडकवासला परिसरातील जांभळी गावात असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून खोदकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ह्दयनाथ दत्तात्रय कडू यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडू हे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण-कडू यांचे चिरंजीव आहे. फिर्यादी यांच्या आई उषा चव्हाण यांनी १९९९ मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट क्रमांक ३३५ मध्ये साडे सहा एकर जागा सीताराम पवार यांच्याकडून खरेदी केली होती.

दरम्यान, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी फिर्यादीकडे फिर्यादीच्या जागेतुन जलवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत विचारणा केली होती. त्यास फिर्यादी यांनी विरोध दर्शवून, जलवाहिनी रस्त्याच्याकडेने करण्याबाबत सांगितले. रविवारी दुपारी, फिर्यादी यांना गडदे यांनी फोन करुन त्यांच्या जागेत जेसीबी आणण्यात आला असून तेथे खोदाई सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी, त्यांची मुले व आई घटनास्थळी गेले. तेव्हा, त्यांना त्यांच्या जमीनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलिसांना खबर दिली.

Team Global News Marathi: