पुणे, मुंबईसह ‘या’ ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा, रेड अलर्ट जारी

 

भारतीय हवामान खात्याने पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात 11 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागातील डोंगरमाथ्यावर सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात दरड कोसळल्याने पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोंगरमाथ्यावर जाणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केलं आहे.

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी. भीमाशंकर परिसरातही काही ट्रेकर्स बेपत्ता झाले होते. सायंकाळी उशिरा त्यांचा शोध लागला. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटकांनी डोंगराळ भागात जाणं टाळावं, असा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच पालघर, ठाणे आणि मुंबईतही आज मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.

Team Global News Marathi: