पुणे: 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध करावा- डॉ. राजेश देशमुख

ग्लोबल न्यूज – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी आणि 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन उत्पादक, ऑक्सिजन सिलिंडर उत्पादक आणि पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली. या वेळी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकाचा जीव बहुमूल्य असून, प्रत्येक जीव वाचवणे महत्वाचे आहे. सध्या कोरोना परिस्थिती कठीण असली तरी ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आणि सिलिंडर भरणाऱ्या व्यावसायिकांनी लोकसेवेच्या भावनेतून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी.

ऑक्सिजन सिलिंडर करणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्याकडील सिलिंडर केवळ वैद्यकीय उपचारासाठी वितरीत करावेत. रुग्णालय व ऑक्सिजन सिलिंडर करणाऱ्या छोट्या उत्पादकांपर्यंत टँकर जलद गतीने पोहोचवण्यासाठी टँकरच्या वाहतूक वितरणादरम्यानच्या त्रुटी उत्पादकांनी दूर कराव्यात.

या वेळी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांचे प्रमुख, ऑक्सिजन सिलिंडर भरणारे उत्पादक आणि पुरवठादारांनी जाणवणाऱ्या अडचणी मांडल्या, रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: