प्रकल्प उभारणीसाठी काय पाठपुरावा केला?; उद्योगमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

 

मागच्या अडीच वर्षांत काहीही काम न करणारे आता खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी त्याच्या राजवटीत राज्यात प्रकल्प उभारण्यासाठी काय काम केले? त्याचा एकतरी पुरावा द्यावा, असे आव्हान उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिले आहे. जिल्हाधिकारी कायार्लयात सोमवारी जनता दरबार झाल्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले असून, येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली जाईल, असे सांगितले.

राज्यात होणारे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात आहेत. त्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘अल्ट्रा मेगा प्रोजेक्टप्रमाणे विरोधकांकडून अल्ट्रा खोटे बोलून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वास्तविक मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात गेल्या १४ महिन्यांत उच्च अधिकार समितीची एकही बैठक झालेली नव्हती. त्यामुळे विविध उद्योगासाठी संबंधित कंपन्यांमध्ये कसलाही पत्रव्यवहार झाला नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन, बल्क पार्क, टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याऐवजी या प्रकल्पासाठी काय प्रयत्न केले होते, त्याचा एकतरी पुरावा सादर करावा.

रायगड जिल्ह्यातील बल्क पार्क प्रकल्पाबाबत दीड वर्षात एकही बैठक झालेली नव्हती. मात्र, आमचे सरकार आल्यानंतर आपण त्याबाबत बैठक घेऊन बल्क पार्कसाठी केंद्राची मदत मिळणार नसली, तरी एमआयडीसीच्या वतीने स्वत: प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत पालकमंत्री म्हणाले, ‘प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, ते डोळ्यांसमोर ठेवून ते बोलले असू शकतात, मात्र त्यांचा गैरसमज झालेला असून आपण स्वत: त्यांची भेट घेऊन सर्व प्रकल्पांबाबतची तारखेनिशी माहिती देऊ असे सांगितले.

Team Global News Marathi: