पोलिसांना गुंगारा देत पळून जाणाऱ्या संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल

 

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात काल मनसेनं आंदोलन केलं. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या आंदोलनादरम्यान संदीप देशपांडे यांनी पळ काढल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, त्यांच्यावर अटकेची कारवाईही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून संदीप देशपांडेंचा शोध सुरु आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते. अशातच संतोष साळी नावाचा व्यक्ती मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून संतोष साळी हा मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस धक्काबुक्की प्रकरणात संतोष साळी देखील आरोपी आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. अशातच राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांनीही पोलिसांच्या हातावर तुरी देत तिथून पळ काढला होता.

Team Global News Marathi: