मटका बुकीवर पोलिसांची धाड : चालकाने टाकली दुसऱ्या मजल्यावरून उडी मटकेवाल्याचा मृत्यू

: सोलापूर : शहरातील अशोक चौक परिसरातील पोशम्मा मंदिराजवळील एका तीन मजली इमारतीत मटका बुकिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी पोहचताच कारवाईच्या भितीने पळून जाण्याच्या प्रयत्नातील एकाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. मात्र, त्यामध्ये त्याला जीव गमवावा लागला आहे. परवेज नुरुद्दीन इनामदार (वय 42) असे त्या मृताचे नाव आहे. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर काहीवेळ जेलरोड आणि सदर बझार पोलिसांमधील हद्दीचा प्रश्‍न सुटला नव्हता.

पोषमा मंदिरजवळील दोन मजली इमारतीमध्ये मटक्याची बुकी सुरू होती.  शहरातील  लावण्यात आलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या आणि पैशाचे कलेक्शन याचे कामकाज या इमारतीमध्ये चालत होते. हा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजल्यानंतर दुपारी अचानक धाड टाकली.

मटका बुकीवर कारवाई करताना इमारतीवरुन पडलेला परवेझ गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. न्यू पाच्छा पेठ हा परिसर जेलरोड आणि सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे घटनास्थळी नेमके कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे हे न समजल्याने गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जेलरोड आणि सदर बझार पोलीसांना कळवले.

त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल आणि त्यांचे कर्मचारी, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे हेही घटनास्थळी दाखल झाले. हे ठिकाण जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.  

ग्लोबल न्युज नेटवर्क: