कत्तलीसाठी गायी घेवून बारामतीवरुन उस्मानाबादला चाललेला टेंपो वैराग पोलिसांनी पकडला

कत्तलीसाठी गायी घेवून बारामतीवरुन उस्मानाबादला चाललेला टेंपो वैराग पोलिसांनी पकडला
लॉकडाऊनमध्येही टेंपोचा २०० कि.मी. प्रवास

प्रतिनिधी बार्शी

कत्तल करण्यासाठी जर्सी गायी घेवून बारामती वरुन उस्मानाबादला रात्रीच्या सुमारास चाललेला टेंपो वैराग पोलिसांनी पकडला. राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा वहातूक बंद असताना,तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर असतानाही या टेंपोने सुमारे २०० कि.मी. प्रवास केला होता. त्यामुळे चेकपोस्टवर नेमकं कोणाला अडवलं जातंय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पो.कॉ. उमेश सुरेश डोळस यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमेश डोळस हे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारात हवालदार आळणे पोलिस मित्र राहुल हणुमंत भोसले, सुजित अनिल गुंजाळ, अजित अनिल गुंजाळ यांच्यासह वैराग गावात रात्रगस्त घालत होते. ते हिंगणी रस्त्यावरील दत्त मंदिराजवळ लाडोळे रस्त्याने आले असताना त्यांना एक चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो (क्र. एमएच १३ -एक्स- २४०३ ) माढा रस्त्याने येवून हिंगणी कडे जाताना दिसला. हा टेंपो बंदिस्त होता.

त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी टेंपो थांबवून मागील भागाची पाहणी केली असता त्यामध्ये १५ जर्सी गायी अरुंद जागेत दाटीवाटीने कोंबलेल्या आढळून आल्या. त्यांनी टेंपो चालक गुलाब खाजुभाई शेख (रा. आसु ता. फलटण जि. सातारा) याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही जनावरे कत्तल करण्यासाठी बारामती वरुन उस्मानाबादला नेण्यात येत असल्याचे सांगितले. हा टेंपो उस्मानाबाद येथील जब्बार शेरखान पठाण याच्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितले.

यावेळी पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीच्या गायी आणि तीन लाख रुपये किंमतीचा टेंपो जप्त केला. याप्रकरणी टेंपेाचालकाविरोधात टेम्पोंमध्ये दोरीने जनावरे निर्दयतेने जखडून बांधून त्यांना इजा होईल याकडे दूर्लक्ष करून बेकायदेशीरपणे त्यांची वाहतूक करुन महा. प्राणी संरक्षण कायदा (सुधारणा ) विधेयक १९९५ चे कलम ५ (अ), ५ (ब)चे उल्लंघन तसेच कलम ८ (ई), ९ , भारतीय प्राणी संरक्षण अधीनियम १९६० चे कलम ११, व मोटार वाहन कायदा कलम १९२ प्रमाणे व महाराष्ट्र प्राणी अधिनियम १० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: