कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी – उदय सामंत

 

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी यांच्या अध्यासन केंद्रासाठी राज्य शासनाकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी याबाबतची घोषणा शनिवारी जळगावात केली. सदर कार्यक्रमासाठी उदय सामंत शनिवारी विद्यापीठात उपस्थित होते. यावेळी भाषणात त्यांनी ही घोषणा केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय २०८८ प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

त्याचप्रमाणे यापुढे आता कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असलेला माणूस प्राचार्यच राहील, याची ग्वाही मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून देत असल्याचेही सामंत यांनी जाहीर केले. पण प्राचार्य म्हणून त्या व्यक्तीने त्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून ते महाविद्यालय क्रमांक एकचे महाविद्यालय राहील, अशा पद्धतीने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 9 तरुणांना अनुकंप तत्वावर तात्काळ नोकरीचे नियुक्तपत्र देण्यात आले. आजपर्यंत या तरुणांना अनुकंपा तत्वावर नोकरीपासून वंचित राहावे लागले; यामागे कदाचित यंत्रणेची चूक असेल. पण ही चूक आज सुधारली गेली असेही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: