फोन टॅपिंग | केंद्र सरकारने आता सत्य लपवण्याऐवजी सर्वांसमोर उघड करावे

 

मुंबई | फोन तापपिंग प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून भाष्य करत भाजपाला घरचा आहेर दिला होता. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

केंद्र सरकारवर फोन टॅपिंग करून हेरगिरीचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी कोणताही फोन टॅपिंग केला नसल्याचे केंद्र सरकारने सांगितलं. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्राने केला. मात्र त्यानंतरही भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट ट्विट करत भाजपाची आणि केंद्र सरकारची पोलखोल केली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने आता सत्य लपवण्याऐवजी सर्वांसमोर उघड करावे अशी मागणी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “जर लपवण्यासारखं काही नाही, तर मोदी यांनी इस्राईलला विचारून पेगासस प्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी असं आव्हानच सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिले आहे. भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केल्याने केंद्र सरकार लपवाछपवी करते आहे हे स्पष्ट झाले आहे.

“सुब्रमण्यम स्वामी यांच्याच मागणीचा भाजपने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावे. स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणावे लागेल. अन्यथा, काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते,” असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: