प्रतिशिवसेना भवन उभारण्याच्या मुद्द्यावरुन सेनेचा शिंदे गटाला इशारा

 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं, नुकतंच पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही पार पडलं.मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजपवर आपलं टीकास्त्र कायम ठेवलं. आता पुन्हा एकदा शिवसेनेनं शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीबद्दलचे दावे केले आहेत.

प्रतिशिवसेना भवन उभारण्याच्या मुद्द्यावर टीका – सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, पुराणात प्रतिसृष्टी उभारण्याची कोणीतरी भानगड केली होती. पुढे काय झाले, याची माहिती दादरच्या सदोबा हगवणकराने घ्यावी. काहींनी प्रतिपंढरी, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे निर्माण करून तुंबड्या भरल्या, पण श्रद्धेचे व निष्ठेचे स्थान एकच असते.

शिवसेनेच्या बाबतीत तर तेच प्रखर सत्य आहे. तेव्हा या सत्याच्या प्रखर तेजाकडे बघण्याचा प्रयत्न या ‘प्रति-शिवसेना भवन’वाल्यांनी करू नये. पुन्हा आताच तुमच्या गटातील भानगडींना तोंड देताना तुमच्या तोंडाला फेस येत आहे. त्यात प्रति-शिवसेना भवनातील नव्या भानगडींचे निवारण करण्याची नसती आफत सांभाळता सांभाळता तुम्हाला मुश्कील व्हायचे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. 56 वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे. ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो!

बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे. शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ-भाकरी खातो, पण महाराष्ट्राशी बेइमानी करणार नाही.

Team Global News Marathi: