पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’कडे चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आरक्षण मुद्यावरून आत्महत्या केलेल्या विवेक राहाटे याच्या संदर्भात ट्विट करत आघाडी सरकारवर टीका करत सरकारला घराचा आहेर दिला होता. यावर आता भाष्य करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला आहे.
पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने सुरू आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारने हा गुंता सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी पार्थ यांनी केली आहे. विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्याबाबत विचारणा केली असता पाटील यांनी पार्थ पवार हे ‘सत्यमेव जयते’च्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.