पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते, शंका असण्याचे कारण नाही – सामना

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदींच्या भाषणामधूनही या दौऱ्यामागील राजकीय हेतू दिसून आला. पंतप्रधान मोदींनी त्यांची जात तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. मात्र याच विषयावरुन आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ गटाने मोदींना लक्ष्य केलं आहे. जम्मू-काश्मीर नेहरुंमुळे तातडीने भारतात विलीन करुन घेण्यात आलं नाही असं म्हणणाऱ्या मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये सध्या काश्मिरी पंडितांची अवस्था काय आहे याची आठवण करुन दिली आहे. तसेच पंतप्रधानांना आताच्या भाषणात जात काढण्याची काहीच गरज नव्हती असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. तेथील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या दौऱ्याचे आयोजन व नियोजन भाजपाने केले आहे. मोदी यांनी एका सभेत सांगितले की, ‘‘माझी जात वगैरे न पाहता गुजरातच्या जनतेने मला समर्थन दिले.’’ ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी? गुजरातला शहरी नक्षलवादाचा धोका वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना गुजरातला गेल्यावर अनेकदा पडतो.

मोदींचे पहिले विधान स्वतःच्या जातीविषयी आहे. पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी हे बरे नाही. जात विसरायला हवी. जात नाही ती जात या सावटातून बाहेर पडले पाहिजे. मोदी यांना देशभरातून मतदान झाले. अनेक मोठ्या राज्यांनी मोदी यांना भरघोस मतदान केले. तेथे जातीचा प्रश्न येतोच कोठे? त्यामुळे गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती, असं ‘सामना’च्या लेखामधून म्हटलं आहे.

Team Global News Marathi: