पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द, राऊतांनी लगावला टोला

 

मुंबई | – दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला देशातील सर्व राज्यांचे प्रतिनिधी जाणार आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोस दौरा रद्द केला तर मुख्यमंत्री दावोसवरून दौरा लवकर गुंडाळून राज्यात परतणार आहेत. दावोस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं असून हे सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान काही तासांसाठी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याची तारीख विनंती करून बदलता आली असती. मात्र शिवसेनेचा पराभव करणे आणि मुंबई महापालिका निवडणुका हेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांना विनंती केली असती तर त्यांनी तारीख पुढे ढकलली असती. देशातील सर्व राज्याचे प्रतिनिधी दावोसला चालले आहेत आणि आमचे सरकार दौरा रद्द करत आहे त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत पंतप्रधान मुंबईत येणार म्हणून दावोस दौरा उपमुख्यमंत्र्यांनी रद्द केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीची चिंता लागली आहे. राजकारण पहिले त्यानंतर महाराष्ट्र असा कारभार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा आहे. गुंतवणूक एकदा निघून गेली तर पुन्हा येत नाही. जनतेला सगळे काही माहिती आहे असं सांगत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. आता या टीकेला शिंदे-फडणवीस सरकार काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: