पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात – संजय राऊत
भाजपा नेत्या आणि माजी महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकतात असे सूचक विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आज ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दलही शिवसेनेत प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील, असे राऊत म्हणाले .