पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

 

नांदेड जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या पाणी-प्रश्न जटिल असून महाराष्ट्रातून वाहून गेलेले पाणी थेट समुद्रात जात आहे. लवादाच्या निर्णयानुसार पाणी सोडावेच लागते. पाणीप्रश्नी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार केला. मीदेखील पाठपुरावा केला. परंतु, मार्ग निघाला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर मी निश्चित पाणी प्रश्नावर बोलणार, असे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे नांदेड येथे १ फेब्रुवारी रोजी येत आहेत. त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांनी बीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांच्याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

तसेच भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. आम्हीदेखील त्यांचे स्वागत करतो. कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्याला विरोध नसतो, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. त्याला विरोध असतो, असेही चव्हाण म्हणाले. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागते, पुढे ते समुद्रात जाते. त्यामुळे त्याचा कुणालाच फायदा होत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नावर आपण त्यांच्याशी संवाद साधू, अशी भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली.

Team Global News Marathi: