पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा दुष्परिणाम :२० दिवसांत १२५ जणांनी गमावले प्राण

सोलापूर : राज्यात कोरोनाचे अनेक नवीन रुग्ण आढळत असताना देखील निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली होती. या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा गाजल्या होत्या. नेत्यांच्या सभेस प्रचंड गर्दी देखील झाल्याचे पहायला मिळाली होती. निवडणूक झाली जिंकणारे जिंकले, हरणारे हरले मात्र, याचे वाईट परिणाम आता दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. येथील नागरिकांना ही पोटनिवडणूक भलतीच महागात पडली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीत काम केलेल्या एका शिक्षकाचे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झालं असल्याचे समोर आले आहे.

शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली

निवडणुकीचा मोठा भार हा शिक्षकाच्या अंगावर टाकला जातो हे आपण अनेकदा पाहिलं आहे. आणि याचाच फटका आता निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला बसला आहे. शिक्षकाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. या निवडणुकीत नेमणूक झालेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्ग झाला. यात या शिक्षकासह त्यांचे वडील, आई आणि मावशीलाही जीव गमवावा लागलाय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या २० दिवसांत १२५ जणांनी गमावले प्राण

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या  पाचपटीने वाढली असून, अनेकांचा जीव देखील गेला आहे. गेल्या २० दिवसांत १२५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. बाधित रुग्ण फेब्रुवारीपासून सातत्याने वाढत आहेत.पण दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने न घेण्याची मोठी चूक केली आणि या काळातच पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे अख्ख्या सोलापूर जिल्ह्यावर कडक लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढवली आहे.

 निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात होती.तीच भीती निवडणुकीनंतर आता खरी उतरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आयोगावर संताप व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त होत होत.

६ एप्रिल २०२१ पूर्वी पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० सक्रिय रुग्ण होते

६ एप्रिल २०२१ पूर्वी मंगळवेढा तालुक्यात अवघे २०६० सक्रिय रुग्ण होते. तर ५२ जणांना प्राण गमवावा लागला होता. पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० सक्रिय रुग्ण होते. २५५ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. हीच आकडेवारी १७ एप्रिल २०२१ या निवडणुकीच्या दिवसापर्यंत वेगाने वाढली. त्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ६८०, तर मृत्यूची संख्या २६५ पर्यंत गेली होती. मंगळवेढा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढून २६०० वर पोहोचली, तर मृत्यूही ७० च्या आसपास होते.

मंगळवेढा तालुक्यात १५ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण

मंगळवेढा तालुक्यात १५ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण असून, ११० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. पंढरपूर तालुक्यात १६ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण सापडले तर ३३५ जणांचा मृत्यू झाला.

साभार टाइम्स नाऊ मराठी

ग्लोबल न्युज नेटवर्क: