“पालिका निवडणुकीत कोणतीही लॉबिंग चालणार नाही” गडकरींनी स्पष्टच सांगितले

 

राज्यात महापालिका निवडणूका पार पडणार आहेत. त्याविषयीचा आराखडा तयार नसला तरी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. “आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही किंवा कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल.”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात भारतीय जनता पक्षाच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीच्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मानकर, डॉ. मिलिंद माने संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रमेश मंत्री, संदीप जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले, “आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी शहरात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. कोणत्याही आमदाराने आपल्या कार्यकर्त्यासाठी लॉबिंग करू नये. अजूनही कुठल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची नावे निश्चित नाहीत. जो प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो आहे अशा खऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्याचा विचार केला जाईल.” असेही गडकरी म्हणाले.

Team Global News Marathi: