‘ पक्ष बाळासाहेबांचा होता स्वतःच्या जीवावर एक केळ्याची गाडी टाकून दाखव’

ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याचा निर्णय दिला व पक्षाचे नावही वापरण्यास बंदी घातल्यानंतर दोन्ही गटांना धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली.

यादरम्यान ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले . तर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी पाहिल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकट आली. अनेक लोक तुटून पडले. पण आतापर्यंत ते खचले नव्हते. आज मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले, हे योग्य नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

यावरून भाजप नेते आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचा होता, तुम्ही स्वत:च्या जीवावर एक केळ्याची गाडी तरी टाकून दाखवा, अशा कटू शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करणारे ट्वीट करत निलेश राणेंनी लिहिले की, “भंगार उद्धव ठाकरे म्हणे रडला. चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे रडला. अरे हे पक्ष आणि हे सगळं बाळासाहेबांचं होतं, गेलं म्हणून रडायचं नाटक करू नको, तुझ्यामुळेच गेलं. ज्या दिवशी स्वतःचं कमावशील तेव्हा ही सगळी नाटकं कर, स्वतःच्या जीवावर एक केळ्याची गाडी टाकून दाखव.

Team Global News Marathi: